रविवार, १० एप्रिल, २०२२

कोळी गीत आयली नारली पूनव


आयली नारली पूनव

                  कवी : निशिकांत हारुगले

 आयली नारली पूनव,शांत होईल समिंदर.

विसावली होरी कशी तरल पाण्यावर.


घेऊन आशीर्वाद एकविरेचा, नारळ वाहुया दर्याला.

तांडेल निघाला सफरीला, मासोलीच्या शिकारीला.

आयली नारली पूनव…. …..


विशाल दर्या राजा र….

कृपा करी कोल्यावर.

देऊन सागराच धन, चालवी कोळ्यांचे संसार.

आयली नारली पूनव …. ……


वल्हवी सुकाणू कोली, नाव चालली पाण्यावरी.

टाकुनी जाळ खोलवरी, एकविरा करेल कृपा तत्वरी.

जाळ्यात अडकेल मस्त मासळी.

ददात मिटेल सारी, येईल सोनियांचा दिस, आनंद घेऊनी प्रत्येक घरीदारी

आयली नारली पूनव ….. …..


तुमच्या आमच्या नशीबाची, साथ दैवी देणगीची

रास लागल माश्यांची, या सागर किनाऱ्यावरी.

सुरमई पापलेट रावस हलवा, बाजार ह्यो सजला.

अशा या सागरी मेव्याची जाऊया खाण लुटायला.

आयली नारली पूनव ….. ….


भरली टोपली म्हावऱ्यान, गोमू चालली बाजारान,

पाहून ताज म्हावरान, सुटल पाणी तूमच्या तोंडायनं.

कस सजल वाढलेलं पान, मसोलीच्या जेवणान.

होईल मन तुमचं तृप्त, मासळी ही खाऊन किनार्यान.

आयली नारली पूनव …. ….


असा कोकणाचा ठेवा, गोड मानून  घ्यावा.

आमच्या पाहूणचाराला तुम्ही एकदा तरी येवा.

आयली नारली पूनव ….. ..,


सोमवार, २८ मार्च, २०२२

एकविरा देवी गीत क्र.३

 कारल्याचा डोंगर


डोंगर डोंगर कारल्याचा २

आई एकविरा माऊलीचा २

नवसाला ती हो पावते, नवसाला ती हो पावते.

सर्वांची आहे माता, ती हो सर्वांची आहे माता,

आई एकविरा ,आई एकविरा.


दक्ष राजकन्येने दिली होमात आहुती.

प्रकटली ती होऊन पार्वती हिमालयाचे पोटी.

शंभू मागे मागणे देवी सतीला,

होईल सांग भेट केव्हा देवी आता.

बोलली देवी सती भोळ्या सांबाला,

सह्याच्या शिखरात इंद्रायणीच्या खोऱ्यात,

कारल्याच्या डोंगरात प्रगटेन काळया कातळात.

तेथेच भेटेन मी सख्या तुला होऊन एकविरा.

सर्वांची आहे माता….


कृती युगात या समिंदर खोऱ्यात,

द्रविड कोळी ब्रह्मणात, आणखी कुणबी लोकांत.

कुलस्वामिनी तू ग आई, कुलस्वामिनी तू ग आई,

आई एकविरा, आई एकविरा.

सर्वांची तू ग माता….. …..


वरी नागली भाताचा हा अपरांत देश,

कुणबी कसती हो शेती घाट मुलखात,

म्हावर गोला करती कोळी सागरात,

त्यांवर तुझी कृपा असे सदा सर्वदा,

तुझ्या नावाचा जयजयकार करुनी

वल्हवती हो होडी वल्हवती हो होडी

आई एकविरा, आई एकविरा,

सर्वांची आहे माता….


कोळी लोकांना नवसाला पावती,

त्यांचे रक्षणा धावुनी जाती.

भाजी भाकरी आनंदान खाती,

अशी सर्वांची पाठी राखी, आई एकविरा माऊली.

सर्वांची आहे माता,… …..


स्थान तिज कार्ले डोंगरी,

नजर तिची समिंदरावरी.

गुलाल उधळीत नाचती,

 गुलाल उधळीत नाचती, भक्तमंडळी.

सर्वांची आहे माता, ती हो सर्वांची आहे माता.

आई एकविरा, आई एकविरा.

  कवी - निशिकांत हारुगले

रविवार, २० मार्च, २०२२

एकविरा साकडं

 एकविरा साकडं


(हे बघ तुझा नवरा दारू पितय, माझे डोंगराला येत नाय. त्याचे प्राणाचे रक्षन सोडून तू मागणे माग.)

आई…ग, आई…ग……..आई.. एकविरे…. ग,

उधानलो सागरानु घातीली होरी पाण्याव,

जन्मभर राहू दे जोडवी माझे पायानो ग, देवी एकविरा माऊली ग.

नवरा माझा भोळा भाबडा, 

भक्ती नाय करत नाय येत तुझे डोंगरा,

तरी अक्षय राहूदे माझा ग चुडा, 

हातात माझ्या आई एकविरा ग.

सागर सफर तो ग करुनी,

 मासोळीच पीक घेऊनी.

पोट भराव आमचं गेला धनी,

 त्या लक्ष्मीचे माहेराणू,

अक्षय राहू दे गळ्यातील काळी पोत,

माहेर सासर मण्यांच बंधन,

कर ग तिचं तू रक्षण, 

कारल्याचे एकविरा ग.

मोकाट पिसाट अरब वारा,

उसळी त्या ग बंदरी लाटा.

होरी येऊदे सुखरूप घरा,

कुंकू राहू दे माझे कपाळा.

कारल्याचे देवी एकविरा.

अजुनी सान माझी ग पोर,

त्यांचं करते भरण पोषण,

भरल्या संसारी कपाळ भरून

मळवट,राहू दे तू माझ्या ग.

डोंगर चढून तुझा मी येईन,

गोडा धोडाचा नेवेद्य करेन,

अहेव येऊदे मला मरण,

कारल्याचे एकविरा ग.

(एकविरा)

नको ग लेकी असे बोलूस,

भरल्या गोकुळात सुखान नांद.

तुझ्या कर्माच्या पुण्याई पुढं,

कृपा कराया तुझ्यावर,

आली एकविरा घरा ग.

उपास तपास जरी नाही केलास,

जरी नाही माझा डोंगर चढलास.

दान धर्माची बुध्दी तू ठेव,

करीन मी ग कृपा ग.

तुझ्या कपाळी लावून कुंकू,

सौभाग्याचं आशीर्वाद देऊन ,

पाठवण करते तुला माहेरातून,

 ही कारल्याची एकविरा ग.

कवी - निशिकांत हारुगले

सोमवार, १४ मार्च, २०२२

एकविरा देवी गीत.१

 कोळी एकविरा

खल्लाटीचो सुटलो वारो उसळती रे मेघराजो,

बरसती जलधारा कारल्याचे डोंगरांनी.

न्हाऊन झायले तृप्त धरणी, ल्याली हिरवा साज नवा.

तांबूस पिवळसर फुलांची नक्षी सजवते कार्ले डोंगरा.

माऊली माऊली आई एकविरा माऊली ll१ll


उधनलो तो सागरदेव उसळी मारती अजस्त्र लाटा,

विसावल्या आगरी कोळ्यांच्या नावा, त्या दंतुर पश्चिम बंदराला.

येतोय आई तुझे दर्शना वाजत गाजत पायी ग आता.

कृपा कर तू आम्हा लेकरा कारल्याचे देवी एकविरा.

माऊली माऊली.... .....ll२ll

पांढर पाण्याचे ओहळ वाहती, खळाळत तुझे गूज गाती,

तुझ्या कृपेचा महिमा सांगती, कारल्याचे एकविरा माऊली.

डोंगरी फिरती रांनपाखरं, सुमधुर त्यांचे गायन.

तुझ्या डोंगरची महती सांगती कारल्याचे एकविरा देवी.

माऊली माऊली .... .....ll३ll

सणासुदीला गर्दी ती होते, तुझाच जयघोष करत .

नारळ वाढवून कोंबडे उडवती,तुझ्याच मंदिरावरती.

सागर किनारा लंघुन चालत आलो तुझ्या डोंगरी.

पुरणपोळीचा नैवैद्य घेऊन कारल्याचे एकविरा.

माऊली माऊली ... ... ..ll४ll

तुझी असावी कृपा आम्हावर साकड मागितलं आज.

पोराबालांवर नजर तू ठेव कारल्याचे देवी एकविरा.

नमन करून दंडवत घालितो चुकल माकल घे ग तुझ्या पदरात.

सदैव लक्ष ठेव आम्हावर कारल्याचे देवी एकविरा ग.

माऊली माऊली .... .....ll५ll 

कवी- निशिकांत हारुगले



कोळी गीत आयली नारली पूनव

आयली नारली पूनव                   कवी : निशिकांत हारुगले   आयली नारली पूनव,शांत होईल समिंदर. विसावली होरी कशी तरल पाण्यावर. घेऊन आशीर्वाद एक...